Wednesday, October 6, 2021

दशावतारांची आरती (Dashavatar Aarti )

 आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म ।

भक्त संकटिं नानास्वरूपीं स्थापिसि स्वधर्म ॥ ध्रु० ॥

अंबऋषीकारणें गर्भवास सोशीसी ।
वेद नेले चोरूनि ब्रह्मया आणुनियां देसी ॥
मत्स्यरूपी नारायण सप्तहि सागर धुंडीसी ।
हस्त लागतां शंखासुरा तुझा वर देसी ॥ आरती० ॥ १ ॥


रसातळासी जातां पृथ्वी पाठीवर घेसी ।
परोपकरासाठीं देवा कांसव झालासी ॥
दाढें धरुनी पृथ्वी नेतां वराहरूप होसी ।
प्रल्हादाकारणें स्तंभीं नरहरि गुरगुरसी ॥ आरती० ॥ २ ॥


पांचवे अवतारीं बळिच्या द्वाराला जासी ।
भिक्षे स्थळ मागुनीं बळीला पाताळा नेसी ॥
सर्व समर्पण केलं म्हणुनी प्रसन्न त्या होसी ।
वामनरूप धरुनी बळिच्या द्वारीं तिष्ठसी ॥ आरती० ॥ ३ ॥


सहस्त्रार्जुन मातला जमदग्नीचा वध केला ।

कष्टी ते रेणुका म्हणुनी सहस्त्रार्जुन वधिला ॥
निःक्षत्री पृथ्वी दान दिधली विप्राला ।
सहावा अवतार परशुराम प्रगटला ॥ आरती० ॥ ४ ॥


मातला रावण सर्वां उपद्रव केला ।
तेहतिस कोटी देव बंदी हरिलें सीतेला ॥
पितृवचनालागीं रामें वनवास केला ।
मिळोनि वानरसहित राजा राम प्रगटला ॥ आरती० ॥ ५ ॥


देवकीवसुदेवबंदीमोचन त्वां केलें ।
नंदाघरीं जाउनी निजसुख गोकुळा दिधलें ।
गोरसचोरी करितां नवलक्ष गोपाळ मिळविले ।
गोपिकांचें प्रेम देखुनि श्रीकृष्ण भुलले ॥ आरती० ॥ ६ ॥


बौद्ध कलंकी कलियुगीं झाला अधर्म हा अवघा ।
सोडुनी दिधला धर्म म्हणुनी न दिससी देवा ॥
म्लेंच्छमर्दन करिसी ह्मणोनि कलंकी केशवा ।
बहिरवि जान्हवी द्यावी निजसुखानंदाची सेवा ॥ आरती० ॥ ७ ॥

श्री महालक्ष्मीची आरती (Mahalaxmi Aarti )



जय देवी जय देवी जय महालक्ष्मी
वससी व्यापकरूपे राहे निश्चलरूपे तू स्थूलसुक्ष्मी. जय.


करवीरपूर वासिनी सुरवर मुनिमाता
पुरहर वरदायिनी मुरहर प्रियकांता
कमलाकारे जठरी जन्मविला धाता
सहस्त्र वदनी भूधर नपुरे गुणगाता. जय.


मातुल्लिंग गदा खेटक रविकिरणी
झळके हाटकवाटी पीयुष रसपाणि
माणिक रसना सुरंग वसना मृगनयनी
शशीकर वदना राजस मदनाची जननी. जय.


तारा शक्ती अगम्या शीवभजका गौरी
सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी
गायत्री नीजबीजा निगमागमसारी
प्रगटे पद्मावती निजधर्माचारी. जय.


अमृत भरिते सरिते अघदुरिते वारी
मारी दुर्घट असुरा भवदुस्तर तारी
वारी माया पटल प्रणमत परिवारी
हे रूप चिद्रुप दावी निर्धारी. जय.


चतुराननाने कुश्चित कर्मांच्या ओळी
लिहिल्या असतिल माते माझे निजभाळी
पुसोनि चरणातळी पदसुमने क्षाळी
मुक्तेश्वर नागर क्षीरसागर बाळी. जय.