येई हो विठ्ठले माझे माउली ये ||
निढळावरी कर ठेवूनि वाट मी पाहे ||
आलिया गोलिया हाती धाडी निरोप |
पंढरपुरी आहे माझा मायबाप || १ ||
पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला |
गरुडावरी बैसोनी माझा कैवारी आला || २ ||
विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिपवाळी ||
विष्णुदास नामा जीवेभावे ओवाळी || ३ ||
असो नासो भाव आम्हा तुज्या थाया
कृपाद्रिष्टि पाहे माझा पंढरीराया
येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥